नवी दिल्ली - काश्मिरातील दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस उपअधिक्षक देविंदर सिंग यांनी जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कारमधून घेवून जाताना सिंग यांना श्रीनगर-जम्मू महामार्गावर अटक करण्यात आली होती.
सिंग यांच्याबरोबर इतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. इरफान शफी मीर आणि सईद नाविद मुश्ताक, अशी इतर दोघांची नावे असून तिघांना दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. पोलीस कोठडीची गरज नसून जामीन मिळावा, असा अर्ज तिघांनी दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे. उद्या( बुधवारी) याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
वकील एम. एस. खान यांनी आरोपींच्या वतीने न्यायालयात अर्ज केला आहे. देविंदर सिंग याला 14 मार्च 2019 ला अटक करण्यात आली होती, तर इतर दोघांना त्याच महिन्यात 19 आणि 27 तारखेला अटक करण्यात आली होती. माझ्या क्लायंटविरोधात पोलिसांकडे काहीही पुरावे नसून त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असे वकीलांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.
काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केल्यानंतर देविंदर सिंग याला हीरा नगर तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र, तेथून नंतर त्याला दिल्लीला हलविण्यात आले. दिल्लीत दहशतवादी कट आखत असल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.