नवी दिल्ली - सैनिकांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाला निलंबित केले होते. हाच जवान आता लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवणार आहे. तेजबहादूर यादव असे त्या जवानाचे नाव आहे.
यादव हरियाणाचे रहिवासी आहेत. यावेळी ते मोदींविरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आपण भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी प्रचार करू, असे यादव यांनी सांगितले. मी गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक लढवण्याची तयार करत आहे. वाराणसीमधील शेकडो लोक माझ्या संपर्कात आहेत. मी वाराणसीतील मतदार यादीमध्येही नाव नोंदवले असल्याचे यादव यांनी सांगितले.
जानेवारी २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरमधील एलओसीजवळ कार्यरत असताना तेजबहादूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी जवानांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत तक्रार नोंदवली होती. सैनिकांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, असे तेजबहादूर यांनी त्या व्हिडिओत म्हटले होते. या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पीएमओ आणि गृहमंत्रालयाने यावर कारवाई करत चौकशीचे आदेश दिले होते.
बीएसएफने यादव यांचा दावा फेटाळला होता. चुकीची तथ्ये मांडली म्हणून यादव यांना सेवेतून काढून टाकण्यात आले होते. यादव सध्या आपल्या कुटुंबासोबत रेवारीमध्ये राहतात. यावर्षी जानेवारी महिन्यात तेजबहादूर यांच्या मुलाने आत्महत्या केली होती.