नवी दिल्ली - माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने धाडसी निर्णय घेणारी नेत्या हरपल्याच्या भावना जगभरातून उमटत आहेत. 2014 च्या मोदी सरकारमध्ये सुषमा स्वराज यांच्याकडे महत्वाचे असे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. त्या जबाबदारीला त्या सार्थ ठरवत अनेक भारतीयांसह परदेशातील लोकांनाही त्यांनी मदत केली आहे. कुणीही मदतीसाठी आवाज दिला की, सुषमा स्वराज त्यांच्या सुटकेसाठी धावून जात असे.
मोदी सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी चुकीने पाकिस्तानात गेलेल्या मूकबधीर गीता भटकर या मुलीला सुखरूप भारतात आणले होते. तसेच तिची सर्व जबाबदारी घेत असल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले होते.
काय आहे प्रकरण -
गीता 10-11 वर्षाची असतानाच चुकीने पाकिस्तानात गेली होती. सीमेवर पाकिस्तानच्या रेंजर्सनी तिला सुरुवातीला लाहोर येथील ईदी फाउंडेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर तिला याच फाउंडेशनच्या कराची येथील शाखेत ठेवण्यात आले. त्यानंतर ईदी फाउंडेशननेच तिचे नाव गीता ठेवले. गीता तब्बल 10 वर्षापेक्षा जास्त काळ पाकिस्तानमध्ये राहिली आहे. यानंतर भारतीय दुतावासाने याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला दिली. त्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गीताला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि गीताला 28 आॅक्टोबर 2015 ला सुखरुप भारतात आणले गेले.
मी गीताला ओझं होऊ देणार नाही - सुषमा
पाकिस्तानमध्ये गेलेल्या मूकबधीर गीता भटकरला भारतात आणण्यात सुषमा स्वराज आणि त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. गीता मायदेशात परतल्यानंतरही त्यांनी गीताच्या कुटुंबियांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केले. याविषयीची आठवण सांगताना एकदा सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, मी जेव्हा जेव्हा गीताला भेटते, तेव्हा माझ्या कुटुंबियांना शोधा, अशी तक्रार ती करते. त्यानंतर जे गीताचे पालक असतील त्यांनी समोर यावं असे आवाहन करतानाच या मुलीला मी ओझ बनू देणार नाही. तिच्या लग्नाची, शिक्षणाची सर्व जबाबदारी आम्ही घेणार आहोत, असा आधार त्यांनी दिला होता. गीता सध्या मध्यप्रदेशच्या इंदौरमधील एका संस्थेत राहत आहे.
गीताच्या कुटुंबीयांची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपये -
गीताच्या कुटुंबीयांची माहिती देणाऱयाला एक लाख रुपये देण्याची घोषणा त्यावेळी सुषमा स्वराज यांनी केली होती. सुषमा स्वराज यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत सांगितले की, एका मुलीला तिच्या कुटुंबीयांनी भेटवण्याचा आनंद दुसऱया कशात नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांची माहिती देण्याची विनंती त्यांनी केली आहे.