नवी दिल्ली - प्रसिद्ध निठारी हत्या आणि बलात्कार प्रकणाचा दोषी सुरेंद्र कोली याला विशेष सीबीआय न्यायालयाने दहाव्यांदा फाशीची शिक्षा सुनावली आहे. हत्या, बलात्कार आणि अपहरणाचे पुरावे नष्ट करण्यावरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. १४ वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून हत्या करण्याच्या प्रकरणात न्यायालयाने हा निर्णय दिला.
विशेष सीबीआय न्यायालयात निठारी प्रकरणाच्या ९ घटनांमध्ये सुरेंद्र विरोधात आरोप सिद्ध झाले होते. या सर्व प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. शनिवारी न्यायालयाच्या या निर्णयावर पुन्हा सुनावणी होणार आहे.
काय होते प्रकरण -
उत्तर प्रदेशच्या निठारी येथे पश्चिम बंगालची रहिवासी असलेली एक अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. ती आपल्या आईसोबत घरकाम करायला जायची. १५ मार्च २००५ ला सकाळी ११ वाजता तिची आई नोकरीच्या शोधात घराबाहेर पडली होती. सायंकाळी ती घरी परतली तेव्हा तिची मुलगी घरी दिसली नाही. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती.
पोलिसांच्या तपासामध्ये निठारी येथील डी-५ या ठिकाणी या अपहरण झालेल्या मुलीचे कपडे आणि चप्पल आढळली होती. त्यामध्ये त्या मुलीचा दात पोलिसांना आढळला होता. डीएनए तपासानंतर या वस्तु त्याच मुलीच्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ११ जानेवारी २००७ पासून हे प्रकरण सीबीआयच्या ताब्यात आले. यामध्ये अनेक साक्षी आणि पुरावे तपासल्यानंतर सुरेंद्र कोली हा दोषी सिद्ध झाला.