नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या धोक्यामुळे NEET, JEE परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार करावा, अशी याचिका भाजपची सत्ता नसलेल्या सहा राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका आज(शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे आता या महिन्यात नीट आणि जेईईच्या पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत.
न्यायमूर्ती अशोक भूषण, बी. आर. गवई आणि कृष्णा मुरारी यांच्या वैधानिक खंडपीठाने परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाहीत, असा निर्णय दिला. पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या पीठाने याआधीही परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला होता. कोरोनाची स्थिती पुढील वर्षीही राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान न होता, शिक्षण सुरू राहणं आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले होते.
नीट आणि जेईईची परीक्षा सहा ते आठ आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत सुरक्षित जाण्यासाठी वाहतूकीची व्यवस्था करण्यात येईल. बस, रेल्वे किंवा विमानांची सोय करता येईल. याबरोबरच जास्त परीक्षा केंद्रांची निर्मिती एकमेंकांचा संपर्क टाळण्यासाठी तयार करण्यात यावीत, असे याचिकाकर्त्यांनी विनंती केली होती.
अनेक विद्यार्थी निमशहरी, ग्रामीण आणि लहान शहरांतून परीक्षा देण्यासाठी येतील. त्यांना सार्वजनिक वाहतूकीद्वारे प्रवास करावा लागेल, त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल, असे याचिकेत म्हटले होते. यासोबतच विद्यार्थ्यांना कोरोना होण्याची भीती, दुर्गम भागात निवासाच्या सुविधांचा अभाव, कमी परीक्षा केंद्रे, पूरग्रस्त भागात राहणारे विद्यार्थ्यांचे प्रश्नही याचिकेत मांडण्यात आले होते. जेईई परीक्षा सुरु झाल्या असून नीट च्या परीक्षा १३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.