मुंबई - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी गुन्ह्यांच्या तपासकार्याविषयी मोठे विधान केले आहे. 'न्यायालयाच्या देखरेखीखाली झालेले तपास अधिक परिणामकारक असल्याचा अनुभव आहे,' असे ते म्हणाले.
विविध प्रकरणांमध्ये योग्य वेळी आणि योग्य प्रकारे दाखल झालेल्या याचिकांमुळे अनेकदा न्यायालयांना तपासकार्यातही लक्ष घालावे लागते. असे ज्या प्रकरणामध्ये होऊ शकते, अशा तपासांना योग्य दिशा आणि गती मिळते. यामुळे संबंधित प्रकरणांमध्ये चांगला परिणाम समोर येतो,' असे चंद्रचूड यांनी म्हटले आहे. ते पेहलू खान प्रकरणाविषयी बोलत होते.
'कधी कधी न्यायाधीश असणे त्रासदायकही असते. कारण, उपलब्ध पुरावे जसे असतील, त्याच्या आधारे निर्णय घ्यावा लागतो. अनेकदा पोलिसांनी केलेला तपास अत्यंत वाईट पद्धतीने केलेला असतो. तो अपुराही असतो. यामुळे अनेकदा पुराव्याअभावी आरोपीला निर्दोष मुक्त करण्याची वेळ येते.'
पेहलू खान हा जनावरांचा व्यापारी होता. त्याला कथिरीत्या गोवंश हत्येच्या आणि गाईंच्या अवैध व्यापाराच्या संशयातून जमावाने बेदम मारहाण केली होती. यात त्याचा मृत्यू झाला. राज्यस्थानच्या अलवर जिल्ह्यात २०१७ मध्ये ही घटना घडली होती.
संबधित प्रकरणामध्ये न्यायालयाने गुरुवारी ६ आरोपींना पुराव्याअभावी संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले. दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्य सरकार न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करेल, असे म्हटले आहे. या प्रकरणी काँग्रेस सरकारने विशेष तपास पथकाकडून पुन्हा चौकशी सुरू करण्यात येईल, असे म्हटले आहे.