नवी दिल्ली - शाहीनबागेतील आंदोलनामुळे बंद असलेला दिल्ली-नोएडा मार्ग सुरू करण्यासंदर्भात आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात शाहीन बागेत मागील 73 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या विभागीय पीठासमोर आज ही सुनावणी होईल.
शाहीनबाग आंदोलनामुळे दिल्ली आणि नोएडाला जोडणारा एक मुख्य रस्ता मागील अनेक दिवसांपासून बंद असून वाहतुकीवर याचा ताण पडत आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने वरिष्ठ वकील संजय हेगडे आणि साधना रामचंद्रन यांची मध्यस्थी म्हणून नियुक्ती केली होती.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार : अमित शाह अॅक्शनमध्ये, 24 तासात घेतल्या तीन बैठका
दोन्ही वकिलांनी शाहीन बागेला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करून आपला अहवाल न्यायालयाला सादर केला आहे. या अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयात रस्त्याच्या याचिकेची सुनावणी होत आहे.