श्रीनगर - उत्तर काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या 'असंघटित' हिंसाचाराच्या घटना तेथील नागरिकांमध्ये दहशतवादाविरोधात रोष पसरत असल्याचे प्रतिक आहे. येथील नागरिकांना आता हिंसाचाराच्या चक्रातून बाहेर पडायचे आहे. त्यामुळेच दहशतवादी संघटनांमध्ये भरती होणाऱयांच्या संख्यमध्ये यंदा तीव्र घट दिसून येत आहे, अशी माहिती लेफ्टनंट जनरल बी एस राजू यांनी दिली.
खोट्या फुटिरतावादाचा आणि पाकिस्तान पुरस्कृत काश्मीरचा प्रचार हा काश्मीरमधील जनतेत दहशतवाद पसरवण्याचा आधार होता. याला येथील स्थानिक तरुण बळी पडत होते. आता मात्र, येथील नागरिकांच्या मनात दहशतवादासाठी अनुकुलता दिसत नाही. एकूणच येथील जनतेला दिर्घकाल चाललेल्या हिसांचार आणि दहशतवादापासून शांतता हवी आहे, असे राजू यांनी सांगितले.
उत्तर काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हिंसाचारात सैन्याने आपले कर्नल, मेजर आणि सीआरपीएफचे काही जवान गमावले. मात्र, याचा अर्थ असा होत नाही की, काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा जोर धरतोय. उलट, दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुणांची होणारी भरती 2018 ते 2019 या कालावधीत जवळपास अर्ध्याने कमी झाली आहे. २०२० मध्ये ही संख्या आणखी कमी झाली आहे, असेही राजू यांनी सांगितले.
लष्कराने दहशतवादी गटांत सामील झालेल्या स्थानिक तरुणांची संख्या सांगण्यास नकार दिला आहे. मात्र, जम्मू-काश्मीरचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी यापूर्वी सांगितले होते की, २०१८ मध्ये २१८ स्थानिक तरुण अतिरेकी संघटनांमध्ये सामील झाले होते तर २०१९ मध्ये ही संख्या 139पर्यंत खाली आली आहे.
सध्या जास्तीत जास्त तरूण खेळ, कौशल्य विकास उपक्रम, नोकरीच्या संधी आणि शिक्षण यात भाग घेत आहेत. आगामी सैन्य भरती मेळाव्यासाठी झालेल्या ऑनलाईन नोंदणीत जवळपास १० हजार काश्मीरी तरुणांची नोंद झाली आहे. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. सरकारने त्यांना स्वतःचे भविष्य घडवण्यास रस्ता दाखवला आहे, असेही जनरल राजू म्हणाले.
पाकिस्तानने नेहमीच आपल्या कृतीतून काश्मिर खोऱयातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यात पाकिस्तानची चिकाटी वाखणण्याजोगी आहे. आत्तापर्यंत सैन्याने पाकिस्तानचे शेकडो प्रयत्न हाणून पाडले आहेत, तरीही पाकिस्तान काश्मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न करतच आहे.
मात्र, भारतीय सैन्य, जे. के. पोलीस, सीएपीएफ, गुप्तचर संस्था आणि नागरी प्रशासन कोणत्याही आकस्मिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, असे लेफ्टनंट जनरल बी एस राजू यांनी सांगितले.