नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला धुळ चारत विजयी झेंडा रोवला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला दिल्लीकरांनी पुन्हा एकदा राजधानीच्या तख्तावर बसवले आहे. विजयानंतर केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता, मुलगी हर्षीता आणि मुलगा पुलकीत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. योगायोगाने आज अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांचा वाढदिवस आहे. दिल्ली निवडणुकीतील विजय हेच मोठे गिफ्ट असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
तर मुलगी हर्षीता आणि मुलगा पुलकीत यांनी विजयाचे सेलिब्रेशन सुरू असल्याचे सांगितले. पार्टीचे नियोजन करत असल्याचे पुलकितने सांगितले. 'यापेक्षा चांगले गिफ्ट मला मिळू शकत नव्हते. सत्याचा विजय झाला आहे. ५ वर्ष अरविंदने कष्ट केले. आम्ही फक्त पाठिंबा दिला. लोकांनी आम्हाला सांगितले तुम्ही प्रचाराला येऊ नका. आम्ही तर आम आदमी पक्षालाच मतदान करणार आहोत, असे पत्नी सुनिता केजरीवाल म्हणाल्या.
मुद्दय़ांवर राजकाराण व्हायला पाहिजे. वाईट गोष्टी कोणत्याही पक्षाने न बोलता संयम पाळायला पाहिजे, असेही सुनिता केजरीवाल म्हणाल्या. लोकांनी नकारात्मक प्रचाराला विरोध केला. जे पाच वर्षात कामे केली त्यावर लोकांनी मतदान केल्याचे मुलगी हर्षीताने सांगितले.