नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांचे आंदोलन सातत्याने सुरू आहे. विद्यापीठात प्रवेश देण्याची मागणी आंदोलक विद्यार्थी करत आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात नॉर्थ गेटवर बेमुदत काळासाठी धरणे आंदोलन सुरू आहे. दिल्लीत मॉल्स, बाजार, जिम यासारखे सार्वजनिक ठिकाणे उघडली असताना जेएनयू विद्यापीठ सुरू करण्यात प्रशासनाला काय अडचणी आहेत, असा सवाल विद्यार्थी करत आहेत.
सरकारने सर्व सार्वजनिक ठिकाणे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. रेस्टॉरंट, पार्क, चित्रपटगृहे आणि साप्ताहिक बाजार पूर्ववत करण्यात आले आहेत. अशात जेएनयू प्रशासनाला विद्यापीठ सुरू करण्यास काय अडचण आहे, असा सवाल 'आईसा' संघटनेची कार्यकर्ता आणि जेएनयूची विद्यार्थिनी मधुरिमाने उपस्थित केला आहे. पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त अडचणी येत आहेत. वाचनालये बंद असल्याने विद्यार्थी अभ्यास करू शकत नाहीत.
अनेक विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत साहित्य वसतिगृहात अडकून पडले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्यास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात प्रशासनाला अनेकदा पत्रे लिहून झाले आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.