भुवनेश्वर (ओडिसा) - ए राजा ये बाहेर, बाहेर ये राजा... असं म्हणत फक्त एकदा हाक मारल्यानंतर जंगलातून अनेक मोर त्याच्याकडं धावत येतात.. ते त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या आज्ञेचं पालन करतात आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. जेव्हा-जेव्हा तो त्यांना बोलावतो तेव्हा ते येऊन त्याने दिलेले खाद्य आनंदानं खातात. ते त्याच्याबरोबर नाचतात आणि कुटुंबाप्रमाणं त्याच्याबरोबर वेळही घालवतात. तो गेल्यावर ते निघूनही जातात... ओडिसाची राजधानी भुवनेश्वरपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर असलेल्या नारजमध्ये एक व्यक्ती आणि मोर यांच्यात कधीही न संपणारं प्रेम दिसून येतं..
हा आहे कान्हु बेहेरा, ज्याला मयूर खोऱ्यातील 'ज्युनियर पिकॉक मॅन' म्हणून ओळखलं जातं. तो पाणू बेहेरांचा नातू आहे, ज्यांना पूर्वी ओडिशाचा 'पिकॉक मॅन' म्हणून ओळखलं जायचं. १९९९ साली आलेल्या भयानक चक्रीवादळानंतर (सुपर साइक्लोन) तीन मोर पाणू यांच्या संपर्कात आले आणि पाणू यांनी त्यांना वाचवले. हळूहळू या वन्य पक्ष्यांविषयी पाणूंचे प्रेम वाढत गेलं आणि मोरांची संख्याही वाढू लागली. दरम्यान, 26 मे 2017 रोजी पाणू यांचा मृत्यू झाला. मोरांविषयी आजोबांचे असलेले प्रेम पाहून कान्हूने त्याच दिवशीपासून या वन्य पक्ष्यांची जबाबदारी घेण्याचे ठरवले. कान्हू घरातील एखाद्या व्यक्तीप्रमाणे या पक्ष्यांची काळजी घेतोय. त्याची आपुलकीची साद ऐकून कबूतर, मैना सारखे इतर पक्षीही त्याने दिले खाद्य टिपायला येतात.
आजोबांचे निधन झाले तेव्हा येथे 67 मोर होते, आता ही संख्या 132
माझ्या आजोबांचे मे २०१७ मध्ये निधन झाले. मी या मोरांना आता जवळपास तीन वर्षे झाली खाद्य देत आहे. जेव्हा आजोबांचे निधन झाले तेव्हा येथे 67 मोर होते, आता ही संख्या 132 पर्यंत वाढली आहे. या मोरांबरोबरच माझा जीवन प्रवास सुरू आहे. मी या मोरांसोबत खोऱ्यात 21 वर्षे पूर्ण केली आहेत आणि भविष्यातही त्यांच्यासोबत राहणार आहे, असे कान्हू चरण बेहरा म्हणतो. सकाळी उठल्यानंतर कान्हू मोरांसाठी खाद्य घेऊन जंगलात जातो. सकाळी साडेपाच ते साडेसात आणि दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत त्यांना विविध प्रकारचे धान्य खायला घालतो. कान्हू मोरांच्या खाद्यावर दररोज जवळपास 500 ते 600 रुपये खर्च करतो. कान्हूचे या पक्ष्यांवरील प्रेम आणि कष्ट पाहून अनेकजण त्याला पैसेही देतात. कान्हू त्या पैशांचा उपयोग मोरांच्या अन्नाची व्यवस्था करण्यासाठी करतो.
लोक मला आर्थिक मदत करतात, त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही
ही केवळ देवाची कृपाच नाही तर मला लोकांची आर्थिक मदत मिळते, त्यामुळेच मी त्यांची व्यवस्था करण्यास सक्षम आहे. दररोज मी त्यांच्या खाद्यावर 500 ते 600 रुपये खर्च करतो. येथे येणारे लोक मोरांना खायला देण्यासाठी मला आर्थिक मदत करतात. त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही, असेही कान्हू म्हणतो. मोर राष्ट्रीय पक्षी असूनही त्यांच्यासाठी राज्य सरकारने कोणतीही तरतूद केलेली नाही, याचे मला वाईट वाटते. मोठ्या संख्येने मोर ज्याठिकाणी एकत्र येतात, त्याठिकाणाला मयूर संवर्धन केंद्र किंवा पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी अनेक लोक करताहेत.
या लोकांनी पुढाकार घेतल्यामुळे मी खूपच समाधानी आहे. ओडिशा सरकारने येथे सुरू असलेल्या कामाचा विचार केला पाहिजे, जेणेकरून या भागाचा विकास होऊ शकेल आणि अधिक संख्येने पर्यटक येथे येऊ शकतात, असे एक पर्यटक रिधी रंजन मोहंत यांनी सांगितले.
मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. आपली लहान मुले मोरांना पुस्तकांमध्ये पाहतात. येथे खऱ्याखुऱ्या मोरांना पाहण्यात त्यांना आनंद मिळतो. त्यामुळे या ठिकाणी मोरांचे संवर्धन केंद्र बनविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. जेणेकरून येथे येणाऱ्या लोकांना मोठ्या संख्येने मोर दिसतील, असे पर्यटक बिधुदत्त प्रधान म्हणाले. राज्य सरकारकडून या कार्याला काही हातभार लागल्यास मोरासारख्या पक्षांची संख्याही वाढेल आणि सरकारला पर्यटनातून पैसेही मिळतील.