नवी दिल्ली - कोरोना प्रसारामुळे मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद आहे. तर देशांतर्गत विमान सेवा आता सुरु करण्यात आली आहे. आधीच तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांचे कोरोनाने कंबरडे मोडले आहे. दरम्यान, प्रवाशांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्पाईस जेट कंपनीने कोरोना सुरक्षा विमा देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार प्रवाशांना कोरोनापासून सुरक्षा विमा घेता येणार आहे.
हा विमा 12 महिन्यांसाठी वैध असणार आहे. कंपनी 50 हजार ते 3 लाखांपर्यंत विमा कवच देणार आहे. यासाठी 443 ते 1 हजार 564 रुपये वार्षीक हप्ता ठेवण्यात आला आहे. यामध्ये वस्तू व सेवा करही समाविष्ट आहे.
रुग्णालयात भरती असतानाचा खर्च, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचे 30 दिवस आणि रुग्णालयातून सोडल्यानंतरच्या 60 दिवसांचा खर्च विम्यात समाविष्ट असेल. तसेच कोरोना चाचणी, औषधे आणि कन्स्लटेशनच्या (वैद्यकीय सल्ला) खर्चाचाही विम्यात समावेश करण्यात आला आहे, असे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या विमा योजनेसाठी स्पाईस जेट कंपनी आणि गो डिजीट जनरल इन्शुरन्स एकत्र आल्या आहेत.