डेहराडून - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण सरकारला मदत म्हणून आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. उत्तराखंडमधील डेहराडून येथील दिव्यांग बांधवानी कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढ्यात हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.
दिव्यांग बांधव आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि स्वच्छता कामगारांसाठी हाताने मास्क आणि फेस शील्ड तयार करत आहेत. 'या संकटाच्या काळात आम्ही हातभार लावत आहोत, याचा आम्हाला फार आनंद आहे. आम्ही सर्वजण कोरोना योद्ध्यांना मदत करण्यासाठी काम करत आहोत,” असे दिव्यांग असलेले राजेंद्रसिंह तंवर यांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याने याबाबत आदेश पारित करण्यात आला आहे. त्यानुसार मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. घरच्याघरी कॉटनचं कापड, कातर आणि शिवणयंत्राच्या किंवा शिवणकामाच्या वस्तू अशा साध्या घरगुती साधनांच्या सहाय्याने मास्क तयार करता येतात.