नवी दिल्ली - भारतात हत्या आणि दहशतवादी कारवाया घडवून आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या खलिस्तानी लिबरेशन फ्रंन्टच्या तीन संशयित दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यातील एका आरोपीला दिल्लीतून तर दोघांना पंजाबातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रात्रेही जप्त करण्यात आली आहेत.
दिल्लीमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी मोहिंदर पाल सिंह नामक व्यक्ती आला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त जसबीर सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील पथक मोहिंदरच्या मागावर होते. दिल्लीतील हस्तशाल येथे पोलिसांच्या जाळ्यात मोहिंदर पाल सापडला. त्याच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
इतर दोन आरोपींना पंजाबातून अटक
मोहिंदर पालकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमधून लवप्रीत नामक आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्यानंतर मानसा येथून पोलीस पथकाने गुरतेज सिंह या आरोपीस अटक केली. आरोपींनी खलिस्तान लिबरेशन फ्रँटशी संबध असल्याचे कबूल केले आहे. विदेशातील काही नेत्यांच्या आदेशावरून भारतात हत्या घडवून आणण्याचा तिघांचा प्रयत्न होता. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.