मुंबई : सहा महिन्यांपासून देश कोरोनासारख्या महामारीच्या संकटाचा सामना करत आहे. या संकटात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असे सर्वच जण जीवाची बाजी लावत कोरोनाशी दोन हात करत आहेत. कोरोना योध्दे म्हणून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र त्याचवेळी आरोग्य क्षेत्रातील एक घटकही कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावत आहे. मात्र, तरीही हा कमालीचा दुर्लक्षित राहिला आहे. ना यांच्या कामाची कोणी योग्य दखल घेत आहे, ना त्यांना 'कोरोना योध्दा' म्हणून संबोधले जात आहे. कोरोना काळात महत्वाची सर्व औषधांची, इतकेच नव्हे तर कोरोनावरील लशीची निर्मिती करण्यापासून ते औषध दुकानात येणाऱ्यांना औषधे देत रुग्णांचे-नागरिकांचे समुपदेशन करण्यापर्यंत महत्वाचे काम हा घटक करत आहे. ते म्हणजे फार्मासिस्ट!
25 सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. पण यंदा मात्र हा दिवस साधेपणाने जगभर साजरा होत आहे. आज देशात सुमारे 15 लाखांहुन अधिक नोंदणीकृत फार्मासिस्ट आहेत. यात महाराष्ट्रातील सुमारे अडीच लाख फार्मासिस्टचा समावेश आहे. यातील कुणी औषध कंपन्यामध्ये औषधे तयार करण्याचे काम करत आहे, तर कुणी औषधांवर संशोधन करत आहे तर कुणी सरकारी-खासगी रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्याचवेळी औषध दुकानाचा परवाना स्टेट फार्मसी कौन्सिल नोंदणीकृत फार्मासिस्टलाच दिला जातो. त्यामुळे औषध दुकान मालक म्हणून तसेच औषध दुकानात फार्मासिस्ट म्हणूनही सेवा देत आहेत. औषध निर्मिती पासून औषधांचे वितरण करणे हे सर्वात महत्वाचे काम आहे. हे काम फार्मासिस्ट करतात.
डॉक्टर रुग्णांना औषधे लिहून देतात. पण फार्मासिस्ट मात्र औषधे रुग्णांना वितरित करत ती कशी घ्यायची इथपर्यंत सांगतात. त्यामुळे ते महत्वाचे असतात, पण ते नेहमीच पडद्यामागे राहतात. कोरोना काळात तर ही बाब प्रकर्षाने समोर येत आहे. कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासुन फार्मासिस्टही डॉक्टर-नर्स प्रमाणे रुग्णसेवा देत आहेत. मार्चपासून अनेक डॉक्टरांनी आपले क्लिनिक कोरोनाच्या भीतीने बंद केली होती. आजही काहींची क्लिनिक बंद आहेत. पण मुंबई वा राज्यातील जवळपास सर्वच औषध दुकाने सुरू होती. फार्मासिस्ट सेवा देत होते. तर कॊरोनावरील औषधाची-लशीची निर्मितीही करण्याच्या कामात फार्मासिस्ट आघाडीवर आहेत. पण या फार्मासिस्टसाठी ना कधी थाळी-टाळी वाजत नाही की त्यांच्यासाठी दिवा लागत नाही. ना त्यांना कोरोना योध्दा म्हणून संबोधले जात नसल्याचे म्हणत महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनने यावर नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोना योध्दा म्हणून या घटकाची दखल घेतली जात नाहीच. पण त्याचवेळी खासगी फार्मासिस्टना 50 लाखांचा आरोग्य विमा ही लागू नाही. रुग्णांना औषध देताना, औषधांचे वितरण करताना फार्मासिस्ट थेट रुग्णांच्या संपर्कात येतात. अशावेळी त्यांना ही मोठ्या संख्येने कॊरोनाची लागण होत आहे. यात काही फार्मासिस्टही शहीद झाले आहेत. पण याची ही दखल कधी कुणी घेताना दिसत नाही. त्यामुळे आता आमच्या कामाची ही दखल घ्यावी आणि खासगी फार्मासिस्टनाही 50 लाखांचा विमा लागू करावा, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी केली आहे. तेव्हा या कोरोना योध्याला ही विमा संरक्षण मिळते का हेच पाहणे महत्वाचे आहे.