पणजी - स्पॅनिश नौदलाचे 'मेंडीज नुनेज' हे जहाज 1 ऑगस्ट रोजी तीन दिवसांच्या गोवा भेटीसाठी दाखल झाले. भारतीय नौदलातर्फे या जहाजाचे दक्षिण गोव्यातील मुरगाव बंदरात सैनिकी पद्धतीने बँडच्या तालात स्वागत करण्यात आले. मेंडीज नुनेज हे दि. 4 ऑगस्टला परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे.
कमांडर आंतोनियो तनगा नामक कमांडिंग अधिकारी असलेल्या या जहाजाचे कप्तान लीएन्ड्रो अलरकॉन आहेत. भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे अधिकारी रिअर अॅडमिरल फिलीपोस पायनुमुटील यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली.
गोवा नौदलाने या दौऱ्यात विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. दोन्ही नौदलात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होण्यासाठी व्हॉलीबॉल सामने, सायकल रॅली यांचे आयोजन करण्यात आले आहे. 'आयएनएस हंस' वर दोन्ही नौदलांमध्ये संवाद साधला जाणार आहे.
मेडीज नूनेझ हे जहाज 2006 मध्ये स्पॅनिश नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले होते. 147 मीटर लांबीच्या या जहाजावर 24 अधिकारी आणि 177 खलाशांचा समावेश आहे.