लखनौ - उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्ष (सपा), बहुजन समाज पक्ष (बसपा) आणि राष्ट्रीय लोक दल (रालोद) यांची आघाडी भाजप विरोधात आज रणशिंग फुंकणार आहे. या पक्षांचे तिन्ही दिग्गज नेते एका मंचावर पहिल्यांदाच यूपीच्या जनतेला संबोधित करतील. आघाडीची ही जनसभा देवबंदमध्ये होणार आहे. लोकसभेच्या सर्वात जास्त जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीचे समीकरण या सभेनंतर बदलणार, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
उत्तर प्रदेशात ८ जागांसाठी पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. पहिल्याच टप्प्यात वरचढ ठरण्यासाठी प्रत्येक पक्ष संपूर्ण ताकद लावत आहेत. या साठीच भाजपने सहारनपूर, मेरठ, मुजफ्फरनगर, बागपत, बिजनौर, गाजियाबाद आणि गौतमबुद्ध नगर येथे मॅरेथॉन सभा घेतल्या आहेत. मात्र, भाजपला आघाडीमुळे मोठे नुकसान होणार, असे विश्लेषकांचे मत आहे.
उत्तर प्रदेशात आघाडी केलेल्या सपा, बसप आणि रालोदची ही पहिलीच जनसभा आहे. यापूर्वी भाजपने ज्या प्रमाणे तिन्ही पक्षांवर कठोर प्रहार केले होते. त्याच प्रमाणे हे तिन्ही पक्ष आज एकाच मंचकावरून भाजपला निशाण्यावर घेणार आहेत. या सभेनंतर पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी केवळ ४ दिवस शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे मतदारांवर यांचा काय प्रभाव होतो हे पाहण्यासारखे झाले आहे.
आज या मंचकावर सपाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव, बसप प्रमुख मायावती आणि रालोदचे अजित सिंह उपस्थित राहणार आहे. उत्तर प्रदेशातील जाट, मुस्लिम आणि अनुसूचित जातींची मते आपल्याकडे वळवण्यासाठी या तिन्ही पक्षातील नेत्यांचा प्रयत्न राहणार आहे.