नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशमध्ये आघाडी केल्यानंतर बहुजन समाज पक्ष (बसप) आणि समाजवादी पक्षाने आता मध्य प्रदेशातही युती केली आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एक प्रेस नोट प्रसिद्ध करून याबाबतची घोषणा केली. अलिकडेच राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याला एक ते दीड महिन्याचा कालावधी उरलेला आहे. त्यापूर्वीच देशातील राजकीय वातावरण तापलेले दिसते. एवढ्यातच बसप आणि समाजवादी पक्षाने मोठी घोषणा केली आहे. मध्य प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुका हे दोन्ही पक्ष सोबतच लढणार हे यावरून स्पष्ट झाले आहे. यापूर्वी मागच्याच महिन्यात दोन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशसाठी आघाडी केली.
मध्य प्रदेशात लोकसभेच्या २९ जागा आहेत. त्यापैकी लोकसभेच्या बालाघाट, टीकमगढ आणि खजुराहो या ३ जागांवर समाजवादी पक्ष निवडणूक लढवणार आहे. तर, उरलेल्या जागा बसपच्या हातात आहेत. नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये बसपने २ जागा जिंकल्या होत्या. मध्य प्रदेशात बसप काँग्रेसशी आघाडी करणार असे कयास लावले जात होते. मात्र, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काँग्रेसशी आघाडी न करता एकटेच निवडणूक लढवण्याची खळबळजनक घोषणा केली होती.
देशामध्ये भाजप विरोधात महाआघाडी करण्याचे वारे वाहत आहेत. त्यामध्ये बसपची भूमिका महत्वाची मानली जात होती. मात्र, उत्तर प्रदेश पाठोपाठ आता मध्य प्रदेशामध्ये युती केल्यानंतर महाआघाडीचे स्वप्न भंगण्याच्या मार्गावर आहे. मायावतींच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात काय परिणाम होतात हे पाहण्यासारखे झाले आहे.