नवी दिल्ली - दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असून दीड महिन्यापासून शेतकरी राजधानीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. काल (शुकवारी) केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांची चर्चेची आठवी फेरीही निष्फळ ठरली. दरम्यान, काँग्रेस पक्षाने शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हर्च्युअली होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.
काँग्रेसचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा -
आंदोलन सुरू झाल्यापासून काँग्रेसने शेतकऱ्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाब आणि हरयाणात ट्रॅक्टर रॅलीही घेतली होती. त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबाही मिळाला होता. दिल्लीत आंदोलन सुरू झाल्यानंतर काँग्रेसने अनेक वेळा अधिकृत वक्तव्य केले आहे. भारताच्या स्वांतत्र्यानंतर मोदी सरकार सर्वात जास्त अहंकारी सरकार असल्याचे म्हणत सोनिया गांधींनी भाजपावर घणाघात केला होता.
शेतकरी आंदोलनावर काँग्रेस आक्रमक भूमिक घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. लोकांशी संवाद साधण्यासाठी काँग्रेस देशभरातील तळागळातील नागरिकांपर्यंत पोहचणार आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीशिवाय दुसरे काहीही मान्य केले जाणार नाही, असे काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी म्हणाल्या. चर्चेची आठवी फेरी निष्फळ ठरल्यानंतर आता पुढची चर्चा १५ जानेवारीला होणार आहे.
२६ जानेवारीला आंदोलकांची ट्रॅक्टर रॅली
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढणार असल्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे. यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली. या रॅलीत ५ हजार ट्रॅक्टर सहभागी झाल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. तिन्ही कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. मात्र, सरकार कायदे रद्द करण्याच्या बाजूने नाही. शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवल्या जातील, असे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिले आहे. मात्र, तरीही शेतकरी सरकारवर विश्वास ठेवण्यास तयार नाही.