नवी दिल्ली - कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 965 वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकारी समिती बैठक घेतली. यावेळी त्यांनी लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात चर्चा केली. यावेळी बैठकील काँग्रेसमधील वरिष्ठ नेते उपस्थित होते.
देशभरामध्ये लॉकडाऊन करणे गरजेचे होते. मात्र, हे करताना पूर्वनियोजन करण्यात आले नव्हते. यामुळे संपूर्ण देशभरातील स्थंलातरित कामागारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
सोनिया गांधी बरोबरच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग , काँग्रेस नेते राहुल गांधी आदींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, 'देशत सध्या अभूतपूर्व आरोग्य आणि मानवतावादी संकट आले आहे. जरी हे आव्हान मोठे असले तरी, त्यावर मात करण्याचा आपला संकल्प दृढ हवा, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
कोरोना विषाणू जगभरामध्ये पसरला आहे. मात्र, यावर मात करताना आपल्यातील मानवता आणि एकी दिसून आली. कोरोना विषाणूचा सर्वांत जास्त फटका गरिबांना बसला आहे. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येत , त्या सर्वांना पाठींबा द्यायला हवा, जोपर्यंत हा कठीण काळ जात नाही, असेही त्या म्हणाल्या.
डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. मास्क आणि इतर वैयक्तिक सुरक्षा उपकरणे युद्धपातळीवर उपलब्ध करुन दिली पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.
यापूर्वही सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहत देशातील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली होती. यामध्ये त्यांनी देशाला लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाची स्तुती करत, आपणही यात सहभागी असल्याचे म्हटले होते. तसेच, यादरम्यान सरकारने कोणती पावले उचलावीत याबाबतही त्यांनी मोदी सरकारला काही पर्याय सुचवले होते.