मदुराई (तामिळनाडू) - लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चिनी सैन्यातील हाणामारीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. यात तामिळनाडूच्या रामनाथपुरम येथील हवालदार के. पलानी यांचाही समावेश आहे. त्यांचे पार्थिव बुधवारी (दि. 17 जून) तामिळनाडूनच्या मदूराई विमानतळावर दाखल झाले होते. आज (दि. 18 जून) त्यांच्या पार्थिवावर रामनाथपुरम येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोमवारी (दि. 15 जून) रात्री व मंगळवारी (दि. 16 जून) झालेल्या भारत-चीन सैन्यातील हाणामारीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. तर 43 चिनी सैनिकही मारले गेले होते. त्यानंतर लष्काराच्यावतीने हुतात्मा जवानांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी पोहोच करण्यात येत होते. त्याच प्रमाणे वीरजवान के. पलानी यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी पोहोचले.
मदुराई विमानतळावर त्यांचे पार्थिव पोहोचल्यानंतर मदुराईचे जिल्हाधिकारी टी.जी. विनय, विमानतळाचे संचालक एस. सेन्थी वलवाल, मदुराई दक्षिण विभागाचे पोलीस महानिरीक्षक के.पी. शन्मुगा राजेश्वरन, पोलीस उपमहानिरीक्षक अॅनी विजया, पोलीस अधीक्षक मणीवन्नन, मदुराईचे खासदार व्यंकटेसन, तिरुपरकुंद्रम यांनी श्रद्धांजली वाहिली होती.
आज (दि. 18 जून) हुतात्मा के. पलानी यांच्यावर रामनाथपूरम येथील मुळ गावी त्यांच्या घरासमोर त्यांचा लष्करी इतमामात दफनविधी करण्यात आला. यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी व कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी वीरराघवा राव यांनी 20 लाख रुपयांचा निधी जाहीर केला.
हेही वाचा - गलवानमधील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना पंजाब सरकारची आर्थिक मदत, सरकारी नोकरीही मिळणार