बंगळुरू - ग्रहणांबाबत भारतात विविध समज-गैरसमज प्रचलित आहेत. त्यातूनच बऱ्याच प्रकारच्या अंधश्रद्धा या काळात आपल्याला पाहायला मिळतात. कर्नाटकच्या कलबुर्गी जिल्ह्यामध्येही असाच प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील ताजस्तानपूर या गावात दिव्यांग असलेल्या लहान मुलांना सूर्यग्रहणादरम्यान जमिनीत पुरण्याची प्रथा आहे.
सूर्यग्रहण सुरू असताना, दिव्यांग लहान मुलांना डोक्याच्या खाली जमीनीत पुरल्यास, त्यांचे दिव्यांगत्व दूर होते, अशी अंधश्रद्धा या गावातील लोकांची आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रहणादरम्यान या आणि आजूबाजूच्या गावातील लहान मुलांना एका ठिकाणी आणून, डोक्याच्या खालीपर्यंत जमिनीत पुरण्यात येते.
पोलिसांनी केली सुटका..
दरवर्षीची ही प्रथा लक्षात घेता, यावेळी कर्नाटक पोलीस असा काही प्रकार घडू नये यासाठी तयार होते. गावात ज्याठिकाणी असा प्रकार दिसून येत होता, त्याठिकाणी धाव घेत पोलिसांनी या लहानग्यांना बाहेर काढले. तसेच त्यांच्या पालकांचेही समुपदेशन केले. संजना (वय - ४), पूजा (वय - ६) आणि कावेरी (वय - ११) या लहान मुलींना पोलिसांनी वाचवले. तसेच आणखी काही लहान मुलांना लोकांनी आणले होते, त्यांनाही पोलिसांनी असे करण्यापासून रोखले.
हेही वाचा : सूर्यग्रहणादरम्यान भारतातील हे एकमेव मंदिर असते खुले; राहू-केतू पूजेसाठी भाविकांची गर्दी