हैदराबाद - तेलंगणामधील शमशाबाद येथे ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू तर अन्य 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडला.
कोरोना विषाणूमुळे देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कामगार आपल्या घरी परतत होते. मिनी ट्रकमध्ये प्रवास करणारे ३० जण रस्ता बांधकाम मजूर होते. ते सर्वजण तेलंगणामधील सूर्यापेठ येथून कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात आपल्या घरी परत जात होते.
दरम्यान, मोदींनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून ते येत्या 14 एप्रिलपर्यंत म्हणजेच 21 दिवस नागरिकांना जेथे आहे, तेथेच घरामध्ये थांबण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण आणण्यासाठी लोकांनी जिथे आहे तिथेच राहणे आणि जनसंपर्क टाळणे आवश्यक आहे. या परिस्थितीत प्रवास करणे किंवा एका शहरातून दुसऱ्या शहराकडे किंवा गावांकडे जाणे धोकादायक आहे. यामुळे अनेक लोकांमध्ये हा संसर्ग फैलावण्याची शक्यता वाढते. मात्र, लोक अद्यापही स्थलांतर करण्यास प्राधान्य देत आहेत. सर्वच लोक 'लॉक डाऊन'चा उद्देश लक्षात घेत नसल्याचे दिसत आहे.