नवी दिल्ली - महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत १५ हजार ५२५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्रातील गंभीर होत चाललेल्या परिस्थितीवरून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात येऊ शकतात यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.
'महाराष्ट्रातील ३६ पैकी ३४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील स्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे कोणत्या उपायोयना राबविता येतील यासंबधी मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितले'. देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्याखालोखाल गुजरात राज्यात रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्रातील सद्य स्थिती
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 15 हजार 525 झाली आहे. मंगळवारी 841 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात मंगळवारी एकूण 350 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 2 हजार ८१९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजारांच्या जवळ आली आहे, तर पुण्यात अडीच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ हजार २०५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर १५ हजार ५२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ९९ हजार १८२ लोक गृह विलगीकरणामध्ये असून १२ हजार ४५६ लोक संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
काल(बुधवारी) राज्यात ३४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६१७ झाली आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमधील २६, पुण्यातील सहा, औरंगाबाद शहरात एक तर, कोल्हापूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य मंत्र्यांनी आज सांगितले.