गंगटोक - सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नाखूश असणाऱ्या सिक्कीम सरकारने आपला निर्णय मागे घेतला आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय सरकारने याआधी घेतला होता. त्याऐवजी, आता केवळ दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एक एप्रिलपासून राज्यात हा निर्णय लागू होणार आहे.
मागील वर्षी मे महिन्यात सत्तेवर आलेल्या प्रेमसिंह तमंग सरकारने पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सहा ऐवजी पाचच दिवस कामकाज करावे लागून, शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी मिळत होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्कीम सरकार हे कामगारांच्या एकूण कामकाजावर नाखूश होते. पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर एकूण कामकाजामध्ये वाढ होण्याऐवजी घट झाल्याचे सरकारला दिसून आले होते. त्यामुळे सरकारने आपला निर्णय मागे घेत पाच दिवसांचा आठवडा रद्द केला असून, त्याऐवजी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव एस. सी. गुप्ता यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा : घरावर दगड कोसळून काश्मिरात एकाच कुटुंबातील चार जण ठार