श्रीनगर - हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या बुरहाण वाणीच्या एनकाउंटरला आज ३ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने फुटीरतावाद्यांनी काश्मीरमध्ये संप पुकारला होता. याला काश्मीरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून आज (सोमवार) अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला आहे. फुटीरतावाद्यांनी पुकारण्यात आलेल्या बंदामुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सुरक्षा दलांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.
सुरक्षा बलाच्या एनकाउंटरमध्ये ८ जुलै २०१६ रोजी कोकेरनाग भागात बुरहाण वाणी ठार झाला होता. यानंतर काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सुरक्षा दल आणि फुटीरतावाद्यांमध्ये चकमकी झाल्या होत्या. यामुळे काश्मीरच्या घाटी परिसरातील काही ठिकाणी ४ महिने कालावधीसाठी कर्फ्यु आणि अघोषित बंद होता. या काळात सुरक्षा दल आणि फुटीरतावाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ८५ जणांचा मृत्यू झाला होता. तर, हजारोंच्यावर जखमी झाले होते.
फुटीरतावाद्यांनी आज (सोमवार) पोस्टर्स दाखवत काश्मीर बंद पाळण्याचे आवाहन केले होते. सुरक्षा दलाच्या गोळीबारामध्ये मृत झालेल्यांसाठी बंद पाळत वीरमरण आलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन फुटीरतावाद्यांकडून करण्यात आले होते. यावेळी बुरहान वाणीचे विचारधारा पुढे चालू ठेवण्यासाठी काम करण्याचे पोस्टर्सही झळकावण्यात आले. फुटीरतावाद्यांच्या या आवाहनाला काश्मीरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. काश्मीरमधील नौव्हाट्टा, खनयार, सफाकदल आणि महाराजगंज येथे सर्वात जास्त बंदचा प्रभाव दिसून येत होता. याठिकाणी सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. श्रीनगर भागातही दुकाने, पेट्रोल पंप आणि इतर व्यवसाय बंद करण्यात आले होते.
खबरदारी म्हणून अनंतनाग, कुलगाम, शोपियान आणि पुलवामा येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तर, राज्यातील इतर भागातील इंटरनेटचा वेग कमी करण्यात आला होता. अतिसंवेदनशील भागात सुरक्षा बलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. आज (सोमवार) श्रीनगर-जम्मू महामार्गावर सुरक्षा बलाच्या कोणत्याही तुकडीला गस्त घालण्यास मज्जाव करण्यात आला होता. परंतु, अमरनाथ यात्रेला जाणाऱया यात्रेकरुंना कोणतीही बंधने घालण्यात आली नव्हती. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली होती, असे पोलीस महानिरिक्षक दिलबाग सिंग यांनी सांगितले.