नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री माता वैष्णवी देवी यात्रा सावधगिरीचा उपाय म्हणून स्थगित करण्यात आली होती. अखेर पाच महिन्यांनंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने 16 ऑगस्टला यात्रा पुन्हा सुरू करण्याचे जाहीर केले आहे.
यात्रा सुरू करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. मंदिर परिसर नियमितपणे स्वच्छ केला जात आहे. तसेच यात्रेकरूंसाठी प्रशासनाने मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या आहेत. रेडझोन असलेल्या जिल्ह्यांमधून येणाऱ्या भाविकांना देखील कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. प्रत्येक भाविकाला आरोग्य सेतू अॅप वापरणे बंधनकारक आहे.
दररोज जास्तीत जास्त 500 यात्रेकरूंना परवानगी दिली जाईल. गर्दी टाळण्यासाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने यात्रेकरूची नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी न केल्यास कोणत्याही भाविकास वैष्णवी देवी यात्रेला जाता येणार नाही. तीर्थक्षेत्र पुन्हा उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे रोजगार निर्माण होईल, असे रहिवाशांनी म्हटलं आहे.