श्रीनगर(शोपिया) - सात वर्षांची मेहरुन्निसा कधी तिच्या वडिलांच्या मोबाइलकडे पाहत होती तर, कधी उद्ध्वस्त झालेल्या घराच्या ढिगाऱ्याकडे. जे कालपर्यंत तिचे घर होते ते आता जमीनदोस्त झाले होते. घर उद्ध्वस्त होण्याच्या काही वेळापूर्वी ती वडिलांच्या बोटाला धरून घराच्या पायऱ्या उतरून खाली आली होती. तिला कुठे माहीत की, वडिलांबरोबरचा हा शेवटचा क्षण आहे.
८ जूनच्या रात्री जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराने पिंजोरा गावातील मेहरुन्निसाच्या घराला वेढा घातला होता. शोपिया जिल्हा मुख्यालयापासून पिंजोरा सुमारे दीड किलोमीटर आहे. त्यावेळी मेहरुन्निसा तिच्या आजोळी गेली होती.
हिजबुल मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांनी या घरात आसरा घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी घराला वेढा दिला होता. त्याच गावातील रहिवासी आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर उमर थोबी आतमध्ये अडकला होता. थोड्याच वेळात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. पहाटेच्या वेळी सुरक्षा दलांनी मशीन गन आणि मोर्टार शेलने घरावर हल्ला केला. काही तासांतच घर संपूर्ण उद्ध्वस्त झाले आणि चारही दहशतवादी मारले गेले.
गोळीबाराच्या काही तासानंतर घराचा वेढा काढण्यात आला. नंतर मेहरुन्निसाच्या कुटुंबीयांना उद्ध्वस्त झालेल्या घरात जाण्याची परवानगी मिळाली. मेहरुन्निसाचे वडील तारीक अहमद पॉल यांचे वय जेमतेम 32 वर्षे असेल. उदास नजरेने घराकडे पाहत होते. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शाहीद टाक हे त्यांच्या घरी पोहचले होते. घर बांधण्यासाठी 12 वर्षे कसे काबाड कष्ट घेतले आणि काही तासांत कसे मातीमोल झाले, हे त्यांनी कॅमेऱ्यापुढे सांगितले.
मात्र, ही कहानी येथेच संपत नाही. ईटीव्ही भारतशी बोलल्यानंतर एक अज्ञात बंदुकधारी व्यक्ती, तो कदाचित दहशतवादी असावा, गावात आला आणि मेहरुन्निसाचे वडील तारिक यांना गावाजवळील जंगलात घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी तारिक यांचा मृतदेह जंगलात आढळला. त्यांच्या शरीरावर गोळी झाडल्याचे निशाण नव्हते. मात्र, छळ केल्याच्या खुणा होत्या. अंगात घालायचा लांब कोट मृतदेहाजवळच आढळून आला. तारिक यांना कोणी मारले, हे कोणालाच माहीत नाही.
तारिख यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या कहानीवरून काश्मीर वादाची खोलवरची मुळे दिसून येतात. ज्यामध्ये सामान्य काश्मिरी कसा भरडला जातो ते दिसते. काश्मीरातील गुंतागुंतीच्या समस्येमुळे कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीच्या दरवाज्यावर मृत्यू येवून उभा राहतो. काही क्षणातच मेहरुन्निसा आणि तिच्या बहिणीने वडिलांसह सर्व काही गमावले. मेहरुन्निसाच्या आईला आपल्यावर काय संकट कोसळलेय हे सुद्धा उमगेना. दोन वेळचे अन्न मिळवण्याची समस्या असता तारिकच्या मृत्यूनंतर संपुर्ण घर उद्ध्वस्थ झाले.