मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर देशभरामध्ये गदारोळ उठला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, सुशांतसिंह प्रकरणावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राजकीय फायद्यासाठी भाजप सुशांतसिंह प्रकरण राज्याच्या मंत्र्याशी जोडत आहेत. वडिलांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुशांत सिंह नाराज असल्याचा दावा राऊत यांनी शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून केला आहे.
बिहार पोलिसांनी या प्रकरणात विनाकारण उडी घेतल्याचे म्हणत राऊत यांनी टीका केली. सुशांतसिंह कठीण काळातून जात असताना कोणीही त्याच्या पाठीमागे उभे राहिले नाही. त्याने जे काही मिळवले ते मुंबईमुळे मिळविले, असे राऊत म्हणाले.
सुशांतसिंह आणि त्याचे वडील कृष्णा किशोर सिंह यांचे संबंध चांगले नव्हते. कारण त्याच्या वडिलांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. बिहार पोलिसांत तक्रार दाखल करण्यास त्याच्या वडिलांना उकसावण्यात आले होते. त्यानंतर तपासासाठी बिहार पोलीस मुंबईला आले. बिहार पोलीस काही ‘इंटरपोल’ नाहीत. हे कधीही मान्य करण्यासारखे नाही, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी सामनामध्ये कठोर शब्दात लेख लिहला आहे. काही माध्यमांच्या मदतीने महराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा दावा राऊत यांनी लेखातून केला आहे. एका माध्यमाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपमानजनक, धमकी देणारे वक्तव्य केले होते. यामुळे शरद पवारांसह अनेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली.
काही माध्यमांना विरोधकांचा पाठिंबा असून ठाकरे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. संवैधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी सरकारने काय कारवाई केली, असे मला शरद पवार यांनी विचारल्याचे राऊत म्हणाले. राऊत यांनी बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावर नियमांचे उल्लंघन करत असल्याचे म्हणत टीका केली.