चंदीगढ - शेतकरी आंदोलनावरून शिरोमणी अकाली दल पक्षाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी पत्रकार परिषद घेतली. शेतकरी आंदोलनाला राजकीय रंग देऊ नका, असा इशारा त्यांनी भाजपाला दिला. शहरी विरुद्ध ग्रामीण असे रुप शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देऊ नका, असेही ते म्हणाले. पंजाब राज्यात शांतता आणि सौदार्ह राहायला हवे. सध्या सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन शांततापूर्ण असल्याचे सुखबीर सिंग म्हणाले.
संपूर्ण देश नियंत्रणाखाली आणण्याचा भाजपाचा प्रयत्न
केंद्र सरकार देशातील सर्व प्रशासन आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करत असून त्याला विरोध करायला हवा, असे ते म्हणाले. सर्व स्थानिक पक्षांनी सरकार विरोधी उभे राहायला हवे, असे सिंग म्हणाले. अकाली दल पक्ष केंद्रात सत्तेत होता. मात्र, कृषी कायदे मंजूर झाल्यानंतर अकाली पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडला. त्यामुळे सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी हरसीमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
शेतकरी आंदोलन शांततापूर्ण -
शेतकरी आंदोलन शांततापूर्ण असल्याचे सुखबीर सिंह बादल म्हणाले. कृषी कायद्यांविरोधात सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आज केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषद घेतली. किमान आधारभूत किंमत (एमएसपी) व्यवस्था कायम राहणार आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी ) बंद होणार नाही. शेतकरी संघटनांनी आम्ही पाठवलेल्या प्रस्तावावर चर्चा करावी आणि चर्चेसाठी आम्हाला सुचित करावे. सरकार चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत, असे नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. मागील चौदा दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.