मुलीकडून जीवाला धोका : अब्दुल रशीद; शेहलाने फेटाळले आरोप - Jammu and Kashmir Director General of Police
शेहलाकडून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तिच्या या कृतीला माझी मोठी मुलगी, माझी पत्नी आणि सुरक्षारक्षक साकिब अहमद यांचेही समर्थन आहे, असा आरोप जेएनयूची माजी विद्यार्थीनी शेहला रशीदचे वडील अब्दुल रशीद यांनी केला आहे.

श्रीनगर - आपल्याला स्वतःच्याच मुलीकडून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचे जेएनयूची माजी विद्यार्थीनी शेहला रशीदचे वडील अब्दुल रशीद यांनी म्हटले आहे. जम्मू प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला. जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांकडे त्यांनी तक्रारही दाखल केली आहे.
'पत्नी आणि मोठ्या मुलीचेही समर्थन'

ते म्हणाले, की शेहलाकडून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तिच्या या कृतीला माझी मोठी मुलगी, माझी पत्नी आणि सुरक्षारक्षक साकिब अहमद यांचेही समर्थन आहे. याची सुरुवात २०१७पासून झाली, जेव्हा शेहलाने जम्मूच्या राजकारणात प्रवेश केला. जीवाच्या रक्षणासाठी आपल्याला जम्मूला जाण्यास भाग पाडण्यात आले.

'माझ्यावर दबाव टाकण्यात आला'
झहूर वटाली आणि रशीद इंजिनिअर यांच्यावर दहशतवादी कारवायांना पैसा पुरवण्याचा ठपका ठेवण्यात आला. यूएपीएअंतर्गत त्यांना अटक झाली, त्याच्या दोन महिने आधी वटालीच्या श्रीनगरमधील सनत नगर येथे मला बोलावण्यात आले. शेहलाला राजकारणात येण्याची परवानगी द्यावी, असे त्यांचे म्हणणे होते.

'३ कोटी रूपयांची ऑफर'
जम्मू काश्मीर पिपल्स मुव्हमेंट (जेकेपीएम) स्थापन करण्याच्या त्यांच्या हालचाली होत्या. त्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी मला ३ कोटी रूपयांची ऑफर दिली होती, असा दावा अब्दुल रशीद यांनी केला. मात्र, हे सर्व अवैध असून आपल्या मुलीला यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला, असे ते म्हणाले.
'अपमानजनक आणि हिंसक'
दुसरीकडे, शेहलाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपली आई, बहिणीवर लावलेले आरोप खोटे आणि चीड आणणाले आहेत. यासंदर्भात न्यायालयात दाद मागणार आहे, असे ती म्हणाली. श्रीनगरच्या लाल नगर परिसरातील आपल्या घरी येण्यास प्रतिबंध घातल्याबद्दलही तिने खेद व्यक्त करत अपमानजनक आणि हिंसक असे म्हटले आहे. १७ नोव्हेंबरच्या न्यायालयाच्या आदेशाचा दाखलाही दिला आहे.