पाटणा - नुकतेच भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावरही शत्रुघ्न सिन्हा बंडखोरी करण्यापासून थांबलेले नाहीत. आता ते काँग्रेस विरोधात बंडखोरी करत आहेत, अशी चर्चा आहे. तर, त्यांच्या या वागणुकीमुळे उमेदवारीवरही गदा येण्याची शक्यता आहे.
भाजपमध्ये ३ दशक काम केल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये असताना पक्षाच्या कार्यप्रणालीवरून त्यांनी अनेकदा टीका केली होती. त्यामुळे त्यांना तेथे बंडखोर नेते म्हणून ओळखले जात होते. आता मात्र, बंडखोरीचा हा स्वभाव काँग्रेसमध्ये असतानाही दिसून येत आहे.
विशेष म्हणजे शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर बिहारच्या पाटणा साहिब येथून निवडणूक लढवत आहेत. तर, त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लखनौ येथून निवडणूक लढवत आहेत. लखनौ येथून काँग्रेसनेही उमेदवारी दिली आहे. मात्र, पूनम सिन्हांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी ते समाजवादी पक्ष आणि बसपच्या रॅलीमध्ये उपस्थित होते. त्यावर काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतला.
हद्द तर तेंव्हा झाली ज्यावेळी शत्रुघ्न यांनी मायावती या पुढील पंतप्रधान होतील, असे पूनम सिन्हांच्या एका जनसभेत म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे बिहार काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत, असे म्हटले जात आहे. त्यावरून बिहार काँग्रेसचे अध्यक्ष सिन्हांची उमेदवारी रद्द करू शकतात, असे म्हटले जात आहे.
एका वक्तव्यात अध्यक्ष मदन मोहन झा यांनी स्पष्ट केले आहे की सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे वेळ आल्यास वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार आपण कोणताही निर्णय घेऊ शकतो.