लखनौ : हाथरसमधील भीषण घटनेबाबत सध्या देशभरातून रोष व्यक्त होतो आहे. असे असताना, हाथरसमधीलच आणखी एका 4 वर्षीय बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला आहे. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आंदोलन सुरू केले आहे.
१४ सप्टेंबरला अलिगढमध्ये या मुलीवर तिच्या मावसभावाने बलात्कार केला होता. यानंतर, तिला अलिगढ वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. तेथून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला दिल्लीला हलवण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला अटक करण्याची मागणी तिचे आई-वडील करत आहेत. मात्र, अलीगढ पोलीस त्यांचे म्हणणे ऐकून घेत नसल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी हे कुटुंबीय रस्त्यावर उतरले असून, आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा तिच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.
दुसरीकडे, अलिगढच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी यापूर्वीच कारवाई करत तक्रार गांभीर्याने न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबीत केले असल्याची माहिती सीओ ब्रह्मदेव यांनी दिली आहे. यानंतर हाथरसमधील पोलीस अधिकारी या कुटुंबीयांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा : धक्कादायक! बलात्कारास विरोध केल्यामुळे अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकत पेटवले