जोधपूर (राजस्थान) : 'जेंडर चेंज' किंवा 'लिंग बदल' हा विषय थोडा किचकट आणि सर्वसामान्यांच्या मनात धसका निर्माण करणारा आहे. याबाबत आपल्या देशात आजही अनेकजण बोलायचं टाळतात. किंवा एखाद्याने हा विषय काढताच अनेकांच्या मनात प्रश्नांचं काहुर माजायला लागतं. आपल्या देशातील अनेक गोष्टींचा भडिमार या विषयावर अनेकांना बोलू देत नाही. मात्र, आजची तरुण पिढी ही काहीतरी नवीन करण्याच्या इच्छेपोटी जेंडर चेंज करण्याचं धाडसही पत्करायला तयार आहे. जोधपूर शहरातही जेंडर चेंजचं असच एक प्रकरण समोर आलं आहे, जे सध्या येथील स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
जोधपूरमध्ये अनेक वर्षांपासून राहणाऱ्या दीपक मारवाडी नामक तरुणानेही शस्त्रक्रियेद्वारे लिंग परिवर्तन केले. आता तो दीपकपासून दीपिका मारवाडी झाला आहे. दीपकने ३ महिन्यांपूर्वी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करून घेतली होती. तो त्याच्या या निर्णयाने समाधानी आहे. आपल्याला लहानपणापासूनच मुलींचे कपडे घालून डान्स करायला आवडायचे, असे दीपक सांगतो. जोधपूरच्या स्थानिक लोकांनीच त्याचे नाव दीपकवरून दीपक मारवाडी असे ठेवले. मात्र, आता त्याची ओळख दीपकवरून दीपिका मारवाडी अशी झाली आहे.
दीपकचे शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे. वडीलांची ढासळती प्रकृती आणि घरातील परिस्थितीमुळे त्याचे शिक्षण अर्धवटच राहिले. वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र, घराची परिस्थिती आणखी बिकट झाली आणि यानंतरच दीपकने छोट्या-मोठ्या कार्यक्रमात डान्स करून पैसे कमवणे सुरू केले. हळूहळू त्याला आणखी काम मिळत गेले आणि परिस्थिती सुधारू लागली. जोधपूरच्या लोकांनी खूप प्रेम दिले आणि अनेक ठिकाणी त्याच्या नृत्याला प्रोत्साहनही मिळाल्याचे दीपक सांगतो. त्याला डान्ससाठी अनेक प्रशस्तीपत्र आणि पुरस्कारही मिळाले आहेत. आता त्याला त्याची कला मोठ्या पडद्यावर सादर करायची असून डान्सचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यासाठी त्याला बॉलीवूड गाठायचे आहे. त्यामुळेच लिंग परिवर्तन केले असल्याचे दीपक सांगतो.
दीपिकाला जाणवले होते, की आपला जन्म चुकीच्या शरीरात झाला आहे, ज्यानंतर तिने हिंमतीने लिंगपरिवर्तन करुन घेतले. मात्र, समाजात असे कित्येक दीपक आणि दीपिका आहेत जे ही हिंमत करु शकत नाहीत, आणि नाईलाजाने आपल्या वाट्याला आलेले जीवन तसेच जगत आहेत. जर लिंग परिवर्तनाबाबत लोकांमध्ये योग्य तशी जागरुकता झाली, तर हे सर्व लोक आपले आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे व्यतीत करु शकतील.