हैदराबाद - तेलंगणात बुधवारी सात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा आणि नव्या सापडणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, ही नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे.
सात रुग्णांसह राज्यातील एकूण बाधितांचा आकडा १ हजार १६ वर पोहोचला आहे. यापैकी ५८२ अॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यात बुधवारी एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यात आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत ४०९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांपैकी ११ जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. दरम्यान, देशभरात दुसऱ्या टप्प्याचा लॉकडाऊन ३ मे ला संपणार आहे. मात्र, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात ७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.