नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या संकटात स्वयं शिस्त गरजेची असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. गुरुवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोना संकटात सर्वांनी स्वत:ला शिस्त लावावी आणि त्याचे पालन करावे, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केले.
संकटाच्या वेळी एकमेकांना मदत केल्याने सर्वात मोठ्या समस्येवर तोडगा निघू शकतो. साथीच्या या काळात स्वयं शिस्त सर्वात महत्त्वाची आहे. आपण ती कायमची अंगीकारण्याची गरज आहे, असे आदित्यनाथ म्हणाले.
कोरोना विषाणूच्या उद्रेकाबद्दल प्रत्येकजण चांगल्या प्रकारे परीचित आहे. जोपर्यंत या साथीला प्रतिबंधित करण्यासाठी लस किंवा औषधोपचार उपलब्ध होत नाही तोपर्यंत विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्स हे केवळ दोन उपाय आहेत, असे ते म्हणाले.
आज संपूर्ण जग कोरोना विषाणूमुळे त्रस्त आहे. अमेरिकेसारख्या सामर्थ्यवान देशांना असहाय्य वाटते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळेवर आणि दूरदर्शी निर्णयामुळे भारत कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखू शकला आहे. जगभरात आतापर्यंत अडीच लाख लोक मरण पावले असले तरी भारत स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम आहे, असेही ते म्हणाले.
राज्य सरकारच्या पातळीवर गरिबांना धान्य व देखभाल भत्ता देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. देशातील इतरत्र अडकलेल्या नागरिकांना स्वदेशी आण्यात येत आहे. तसेच देशातील इतर राज्यात अडकलेल्या मजूरांना आम्ही राज्यात परत आणले आहे, असे आदित्यनाथ यांनी सांगितले.