नवी दिल्ली - आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त रामनाथ कोविंद यांनी देशवासियांनी शुभेच्छा दिल्या. कोविंद म्हणाले, की विज्ञान आणि तंत्रज्ञान ही "समावेशक प्रगतीची प्रमुख साधने" आहेत. तसेच जगभरात कोरोनाविरोधातील लढ्यात वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ हे अग्रभागी आहेत, असेदेखील कोविंद म्हणाले.
राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विट केले की, "1998 च्या अण्वस्त्र चाचणीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या नागरिकांना शुभेच्छा. यादिवसाच्या निमित्ताने आपल्या देशाला स्वावलंबी बनविणाऱ्या वैज्ञानिकांच्या अतुलनीय योगदानाचा आदर करतो.
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांना सर्वसमावेशक प्रगतीची प्रमुख साधने म्हणून ओळखतो. आपले वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ देखील कोरोनाविरुद्धच्या जागतिक लढाईत खूप महत्वाचे काम करत आहे. त्यांच्यावर देशाला अभिमान आहे, असेदेखील कोविंद यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये नमूद केले.
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील देशवासियांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी राजस्थानच्या पोखरणमध्ये १९९८मध्ये झालेल्या परमाणू चाचणीची आठवण काढली. पोखरणमध्ये झालेली चाचणी भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा क्षण होता आणि तो राहील.
मे १९९८मध्ये भारताने पोखरणच्या दुसऱ्या चाचणीत पाच आण्विक स्फोटांची मालिका चाचणी घेतली होती. त्यामुळे ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.