नवी दिल्ली - नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15 जुलैपर्यंतची नियोजित आंतरराष्ट्रीय विमान उड्डाने रद्द केली आहे. मात्र काही ठराविक मार्गांवरील विमान सेवा सुरु ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
यासंबधी नागरी विमान वाहतूक विभागाने एक पत्रक जारी केले आहे. मालवाहू विमानांना हा आदेश लागू असणार नाही. त्यांची सेवा सुरुच राहील. याबरोबरच विमान वाहतूक विभागाने विशेष परवानगी दिलेली विमान सेवाही सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोरोना विषाणूच्या फैलावानंतर भारताने आंतरराष्ट्रीय विमान सेवा 23 मार्चला बंद केली होती. अमेरिका, इंग्लड, संयुक्त अरब अमिरात, जर्मनी आणि फ्रान्स या देशाबरोबरची विमान सेवा सुरुच राहणार असल्याचे सुत्रांनी ईटीव्ही भारतला डीजीसीएचा निर्णय येण्याआधी सांगितले होते.
अमेरिका, इंग्लड, संयुक्त अरब अमिरात, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जमैका आणि इतर काही देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु केली आहे. भारतातील स्पाईस जेट, इंडिगो, गोएअर यांच्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा 'वंदे भारत मिशन' अंतर्गत सुरु होत्या. त्याद्वारे परदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात माघारी आणण्यात आले आहे.