नवी दिल्ली - 1984 मधील शीखविरोधी दंगली प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव आपल्याला अंतरिम जामीन मिळावा, अशी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती.
मुख्य न्यायमूर्ती ए. एस.बोबडे यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी केली. 'हे काही लहान प्रकरण नाही. आम्ही जामीन मंजूर करू शकत नाही', असे खंडपीठाने म्हटलं. ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी सज्जन कुमार यांची बाजू मांडली. गेल्या 20 महिन्यापासून तुरुंगात असून त्यांचे 20 किलो वजन कमी झाले आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला.
दंगली प्रकरणातील पीडित व्यक्तींकडून ज्येष्ठ वकील एच. एस. फुलका यांनी सज्जन कुमार यांना अंतरिम जामीन देण्यास नकार द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. कुमार यांना जे काही उपचार हवे आहेत. ते आधीच त्यांना देण्यात येत आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालायनं 17 डिसेंबर 2018 ला सज्जन कुमार यांना शीखविरोधी दंगलीत दोषी आढळल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
शीखविरोधी हिंसाचार -
31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यादिवशी रात्रीपासूनच शीखविरोधी हिंसाचारास सुरुवात झाली. त्यानंतर सतत तीन दिवस दिल्ली धगधगत होती. 1 ते 3 नोव्हेंबर या दरम्यान सुमारे 10 हजारांपेक्षा जास्त शीख बांधवांची हत्या करण्यात आली होती.