नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. १८ मे १९ जूनदरम्यान सर्व याचिकांवरील सुनावणी व्हिडिओ किंवा ऑडियो स्वरुपात होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. १८८१ या हेल्पलाईन क्रमांकावर वकील किंवा इतर कायदेविषयक माहितीसाठी संपर्क करता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्व लक्षात घेता यापूर्वी केवळ महत्त्वाच्याच याचिकांवरील सुनावणी घेतली जात होती. मात्र, आता १८ मे ते १९ जूनदरम्यान सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन सुनावणी होणार आहे. न्यायालयाने उन्हाळी सुट्ट्यांमध्येही कपात केली आहे.
कोरोनाचा आळा घालण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल याबाबत आम्ही सुचना आणि सल्ले मागवले होते. यानंतर आम्ही ऑनलाईन सुनावणीचा मार्ग निवडला. यानुसार १८ मे ते १९ जूनदरम्यान व्हिडिओ आणि ऑडिओ स्वरुपात सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेली सुनावणी रेकॉर्ड केली जाणार नाही, असेही न्यायालयाने सांगितले. कोरोनामुळे सुनावणीसाठी घेण्यात न आलेले विषय आता व्हर्च्युअल कोर्टासमोर सादर होतील, असेही सांगण्यात आले.
लॉकडाऊन झाल्यानंतर २५ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न्यायालयाने वकिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यासह कर्मचाऱ्यांना येण्यासही मज्जाव केला. लॉकडाऊनदरम्यान महत्त्वाच्या विषयांवरील सुनावणीसाठी न्यायाधीशांच्या निवासस्थानी खंडपीठ जात असे तर इतर वकिलांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडून पुढील कार्यवाही होत असे, असेही न्यायालयाने सांगितले.