नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने माकप नेते सीताराम येचुरी यांना जम्मू-काश्मीरला जाण्याची परवानगी दिली आहे. येचुरी माजी आमदार युसूफ तरिगामी यांना भेटण्यासाठी जम्मू-काश्मीरला जाणार आहेत. 'आम्ही तुम्हाला जाण्याची परवानगी देऊ. तुम्ही पक्षाचे महासचिव आहात. मात्र, बाकी काहीही करू नका,' असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे.
'सीताराम येचुरी युसूफ तरिगामी यांना केवळ मित्र म्हणून भेटू शकतात. कोणत्याही राजकीय हेतूसाठी नाही,' असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा - देशातील गंभीर मंदीचा मोदी सरकारला पत्ताच नाही - दिग्विजय सिंह
२४ ऑगस्टला येचुरी यांनी युसूफ यांना भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. आर्टिकल ३७० हटवल्यानंतर युसूफ यांना कथितरीत्या पडकण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. युसूफ हे माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य होते. ते जम्मू-काश्मीर विधानसभेत ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. माकपने दिलेल्या निवेदनानुसार, येचुरी यांनी आर्टिकल ३२ च्या आधारे ही याचिका दाखल केली होती.
राहुल गांधींसह ९ ऑगस्टला श्रीनगरला गेलेल्या शिष्टमंडळातून येचुरीही तिकडे पोहोचले होते. मात्र, सर्व नेत्यांना विमानतळाबाहेर पडून न देता परत पाठवण्यात आले होते.
हेही वाचा - आर्टिकल ३७० वरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे ५ सदस्यीय घटनापीठ
'सर्व काही ठीक असेल तर, आम्हाला का अडवण्यात येत आहे? आम्ही ९ ऑगस्टला तेथे गेलो, तेव्हाही आम्हाला अडवण्यात आले. राज्यपालांच्या निमंत्रणावरून आम्ही १० पक्षांमधील १२ जण तेथे गेलो होतो. मात्र, आम्हाला विमानतळावरूनच परत पाठवण्यात आले,' असे येचुरी म्हणाले.