भोपाळ - मध्यप्रदेशातल्या उज्जैन शहरात लहान-लहान गल्लीबोळांनी बनललेला कांगी मोहल्ला आहे. एकेकाळी या भागात लाकडापासून कंगवा बनवणाऱ्या कारागिरांची संख्या मोठी होती. मात्र, लाकडाचा कंगवा बनवणाऱ्या कारागिरांपैकी जे काही लोक उरलेत त्यातील एक म्हणजे छगनलाल. या भागात छगनलाल यांचे घर आहे, हे घर अनेक दशकांपासून सर्वांना पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहेत.
लाकडाचा कंगवा जर कोणाला पाहिजे असेल तर, छगनलाल यांच्याकडे ती इच्छा पूर्ण होईल. छनगलाल यांचे वय आता ८० च्या घरात आहे, मात्र, पूर्वापार चालत आलेली ही कला त्यांनी नेटाने सुरू ठेवली आहे. सुरकुत्या पडललेले त्यांचे हात आजही सफाईदारपणे लाकडाचे कंगवे बनवतात. कंगवे बनवण्यासाठी ते शिसम झाडाचे लाकूड वापरतात. लाकडापासून बनवलेला कंगवा प्लास्टिकच्या कंगव्यापेक्षा चांगला आहे.
या कंगव्यामुळं डोक्याची मालीश तर होतेच, पण केसगळतीही थांबते, असा त्यांचा दावा आहे. स्वतःच्या हाताने बनवलेला कंगवा चांगला आहे की, नाही ते स्वत:चा भांग पाडून पाहतात. छगनलाल पक्षी, माशांच्या आकारासह विविध नक्षीकाम असलेले कंगवे बनवतात. त्याची किंमत ५० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत आहे. त्यांच्या या कलाकृतीला अनेक सन्मानही मिळालेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले आहे.