चेन्नई - तुतिकोरीन जिल्ह्यातील सथनकुलम येथील पोलिसांच्या ताब्यात असताना पिता-पुत्राचा तुरुंगात मृत्यू झाला होता. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सहा पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस उपनिरीक्षक रघू गणेश याला अटक केली आहे. पाच पोलिसांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच त्यांना देखील अटक करण्यात येईल, सूत्रांनी सांगितले आहे.
पिता-पुत्राच्या मृत्यूप्रकरणी आरोपींवर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस महानिरीक्षकांच्या सूचनेनुसार याप्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी 12 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
19 जूनला प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत मोबाईल दुकान बंद न केल्यामुळे जयराज (वय 59) याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्याचा मुलगा फेनिक्स पोलीस ठाण्यात गेला असता,त्यालाही अटक करण्यात आली होती. यानंतर दोन दिवसानंतर दोघांचा तुरुंगात मृत्यू झाला होता.