नवी दिल्ली - नीरव मोदींनी भारतीय बँकाची फसवणूक करत ११ हजार ४०० कोटींचा घोटाळा केला होता. नीरव मोदीने केलेल्या पीएनबी घोटाळ्यानंतर आता संदेसारा ब्रदर्सनी केलेला घोटाळा समोर आला आहे. संदेसारा ब्रदर्सनी भारतातील विविध बँकांच्या विदेशातील शाखांमधून कर्जे काढताना १४ हजार ५०० कोटींचा घोटाळा केला आहे. ईडीने केलेल्या तपासात ही माहिती समोर आली आहे.
ईडीच्या सुत्रांनुसार, ऑक्टोबर २०१७ साली सीबीआयने बँक खात्यात फेरफारप्रकरणी संदेसारा ग्रुपच्या प्रमुखांविरोधात चौकशी केली होती. यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार ५ हजार ३८३ कोटींचा घोटाळ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ईडीने याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर, संदेसारा बायोटेक लिमिटेड (एसबीएल) कंपनीचे प्रमुख नितीन संदेसारा, चेतन संदेसारा आणि दिप्ती संदेसारा यांनी भारतीय बँकांची फसवणूक करताना जवळपास १४ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे.
संदेसारा ग्रुपच्या विदेशात असलेल्या कंपन्यांनी भारतीय बँकांच्या परदेशात असलेल्या शाखांमधून ९ हजार कोटींचे कर्ज घेतली आहेत. ही कर्जे भारतीय आणि विदेशी दोन्ही चलनाच्या स्वरुपात घेण्यात आली होती. ही कर्जे प्रामुख्याने आंध्रा बँक, युको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ इंडियाकडून घेण्यात आली होती. बँकांकडून घेतलेल्या कर्जांची रक्कम कंपन्यांच्या खात्यातून इतर खात्यात पाठवण्यात आली. ही रक्कम कंपनीच्या कामासाठी न वापरता स्वत:च्या वैयक्तीक कामासाठी आणि नायजेरियास्थित तेलाच्या कंपनीसाठी वापरण्यात आली, असे ईडीने तपासानंतर स्पष्ट केले.