बंगळुरू(कर्नाटक) - बंगळुरू पोलिसांच्या सेंट्रल क्राईम ब्युरोने (सीसीबी) अमली पदार्थ प्रकरणात अभिनेता विवेक ओबेरॉय याचा भाऊ अक्षय ओबेरॉयच्या मुंबईतील घराची आज(गुरुवार) झाडाझडती घेतली. पोलीस विवेक ओबेरॉयचा मेव्हणा आदित्य अल्वाचा शोध घेत आहेत. अमली पदार्थ प्रकरणात तो ४ सप्टेंबरपासून फरार असून बंगळुरू पोलीस त्याच्या मागावर आहेत.
पोलिसांनी दुपारी अक्षय ओबेरॉयच्या घराची झडती घेतली. तसेच अक्षयची सुमारे अडीच तास चौकशी केली. आरोपी आदित्य हा अक्षय ओबेरॉयच्या घरी लपल्याचा संशय आल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून अभिनेता विवेक ओबेरॉय हा त्याचा भाऊ अक्षयच्या घरी राहत आहे. आदित्य बरोबरच या प्रकरणात शिवप्रकाश चुप्पी आणि शेख फाजिल हे आरोपीही फरार आहेत.
'अमली पदार्थ प्रकरणात आदित्य अल्वा फरार आहे. तो विवेक ओबेरायचा नातेवाईक असून तो त्यांच्या घरी लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही घराची झडती घेतली. तपासासाठी न्यायालयाचा वॉरंट काढला असून घराची झडती घेतली', असे पोलीस म्हणाले.
या प्रकरणात कन्नड सिनेसृष्टीतील गायक, कलाकार यांचे कनेक्शन समोर आले आहे. ड्रग्ज प्रकरणात अल्वा हा पाचवा आरोपी आहे. तो सधन कुटुंबातील असून कर्नाटकातील दिवंगत नेते जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. जीवराज अल्वा हे कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचे अंत्यत निकटचे सहकारी होते तसेच एक प्रभावी नेते म्हणून त्यांची राज्यात ओळख होती. मंगळवारी बंगळुरू पोलिसांनी ओडिशातील भूवनेश्वरमधून आश्विन भोगी या आरोपीला अटक केली. पोलिसांनी आदित्य अल्वा विरोधात 'लूक आऊट नोटीस' जारी केली आहे.