मुंबई - सरकारविरोधात मोर्चा आणि आंदोलन करणाऱ्यांशी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली होती. महाजनांवर विश्वास ठेवणे सकल मराठा क्रांती महामोर्चाला महाग पडले आहे. आम्ही महाजन यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली, असे सकल मराठा क्रांती महामोर्चाने म्हटले आहे.
आम्हाला विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आम्ही २२ फेब्रुवारीला उपोषणाला आझाद मैदान येथे बसणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले; पण त्याचा कोणताही फायदा समाजाला मिळत नाही. आम्ही ३ महिन्यांपूर्वी १६ दिवसाचे उपोषण केले होते. आमच्या काही मागण्या सरकार दरबारी दिल्या होत्या. या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन मध्यस्थी करणारे गिरीश महाजन यांनी दिले होते. परंतु, अजूनही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. महाजन यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली. म्हणून आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत. अन्न आणि पाण्याचा त्याग करणार आहोत, असे क्रांती मोर्चाचे संजय घागे यांनी सांगितले.
सकल मराठा क्रांती महामोर्चाच्या मागण्या...
- आंदोलनात सहभाग घेतलेल्या १३०० तरुणावरील गुन्हे मागे घ्यावे
- १६ टक्के आरक्षणाचा कायदा केंद्रात पास करावा.
- बार्टीच्या धरतीवर छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सुरू करावे
- आंदोलनात जीव गेलेल्या आंदोलकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी
- सारथी संस्थेच्या अध्यक्ष पदावरून सदानंद मोरे यांचा राजीनामा घेऊन आयुक्तांची नियुक्ती करावी.
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह सुरू करावे
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या मराठा समाजातील युवकांना बिनव्याजी कर्ज देण्यात यावे