जयपूर - काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपावर टीका केली. फक्त नागपुरातून हाफ चड्डी घालून भाषणे दिले म्हणजे राष्ट्रवादी असल्याचे आणि शेतकऱ्यांच्या बाजून असल्याचे सिद्ध होत नाही, असे सचिन पायलट म्हणाले.
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभा घेतली, त्यावेळी त्यांनी नाव न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. शेतकऱयांच्या हिताचा विचार करून निर्णय घेण्यात खरा राष्ट्रवाद असल्याचे पायलट म्हणाले. मात्र, भाजपाने नवीन शेतकरी कायदे आणून शेतकऱयांना आणखी संकटात टाकले आहे.
४० दिवसांपासून सुरू आहे आंदोलन -
राजधानी दिल्लीच्या सिंघू आणि टिकरी सीमेवर मागील ४० दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने पास केलेले तीन कायदे रद्द करावेत अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा बळीही गेला आहे. आतापर्यंत शेतकरी संघटना आणि सरकारदरम्यान सहावेळा चर्चा झाली आहे. मात्र, त्यातून काहीही निष्कर्ष निघाला नसल्याने आज (सोमवार) पुन्हा चर्चा होणार आहे.