नवी दिल्ली - दिवंगत एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहित तिवारी यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या करण्यात आली, अशी शंका या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तींविरोधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नी आणि आईने मंगळवारी रोहितला दिल्लीच्या साकेत रुग्णालयात दाखल केले होते. जेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा मृत्यू हृदविकाराने झाला, असा त्यावेळी डॉक्टरांनी अंदाज वर्तवला होता. मात्र, त्यानंतर शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू नैसर्गिक नसून हत्या आहे, असे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडालेली आहे.
आरोग्य मंडळाने पोलिसांना रोहितच्या मृत्यूसंदर्भात जवळपास ८ ते १० पानांचा शवविच्छेदन अहवाल दिला आहे. त्यामध्ये मृत्यूचे कारण स्पष्टपणे लिहिलेले नाही. हा अहवाल वैद्यकीय भाषेत लिहिलेला असल्यामुळे पोलिसही गोंधळात पडले होते. त्यांनी दिवसभर विविध तज्ज्ञांचा सल्ला घेतला होता. त्यानंतरही पोलिसांना मृत्यूचे कोडे उलगडण्यात अपयश येत राहीले.
अखेर फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर त्याची हत्या झाली असावी, असा अंदाज लावण्यात येत आहे. उशीने तोंड आणि नाक दाबून त्याची हत्या करण्यात आली असवी, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यावरून डिफेन्स कॉलनी पोलिसांनी तक्रारही नोंदवून घेतली आहे.
कोण होते रोहित शेखर -
रोहित शेखर यांनी २००८ मध्ये आपण एन. डी. तिवारी यांचे पुत्र असल्याचा खटला न्यायालयात दाखल केला होता. त्यावरून तिवारी यांना डीएनए तपासणीसाठी स्वतःचे रक्त द्यावे लागले होते. त्यावेळी तिवारी यांनी ही बाब सार्वजनिक न करण्याची न्यायालयात मागणी केली होती. डीएनए अहवालात रोहित हे तिवारींचेच पुत्र आहेत, असा खुलासा झाला होता.
त्यानंतर २०१४ मध्ये तिवारी यांनी रोहितच्या आईशी वयाच्या ८९ व्या वर्षी लग्न केले होते. रोहित यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचे एक वर्षापूर्वीच अपूर्वा शुक्ला यांच्याशी लग्नही झाले. अपूर्वा या सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. न्यायालयाचा वाद संपल्यानंतर रोहित एन. डी. तिवारी यांच्यासोबत राहात होते. त्यांचा साखरपुड्याच्या वेळी तिवारी रुग्णालयात भरती होते. त्यावेळी संपूर्ण कुटुंबीयांसोबत रोहित त्यांना भेटण्यासाठी गेले होते.