नवी दिल्ली - शहरातील काशमेरे परिसरात पोलिसांनी एका २३ वर्षीय चोराला अटक केली. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने स्वत:च्या अंगावर मानवी विष्ठा फासला होती. त्याचबरोबर त्याने पोलिसांच्या दिशेनेही घाण फेकण्याचा प्रयत्न केला. अटक केलेल्या आरोपीचे नाव अर्जुन असे आहे. तो मदनगीर येथील रहिवाशी आहे.
पोलीस नित्यानंद मार्गावरील काशमेरे गेट परिसरात गस्त घालत असताना तेथे दोन मोटारसायकलस्वार संशयास्पद स्थितीत वावरताना दिसले. पोलिसांनी हटकले असता दोघांनी तेथून पळ काढला. एक किलोमीटरपर्यंत पाठलाग केल्यानंतर अर्जुनला पोलिसांनी पकडले. पोलीस जवळ येताच त्याने पँटच्या खिशात ठेवलेली मानवी विष्ठा बाहेर काढली व स्वत:च्या अंगावर फासली. त्याने पोलिसांच्या अंगावर ही घाण फेकली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडले. त्याच्याकडून पेपर स्प्रे, चाकू, आटोमोबाईल तेल, एक सोन्याची चेन, मोटारसायकल जप्त केली आहे.