नवी दिल्ली - दिल्लीच्या प्रसिद्ध राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालय आता भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने ओळखले जाईल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, 'पीजीआयएमआयआर अँड डॉ. आरएमएल हॉस्पिटल, नवी दिल्ली' या नावाऐवजी 'अटल बिहारी वाजपेयी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटल' हे नाव वापरण्यास मंजूरी दिली आहे.
येत्या १६ ऑगस्टला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधानांना या उद्घाटनासाठी औपचारिक आमंत्रण पाठवले गेले आहे. त्यानुसार, १६ तारखेला रुग्णालयाच्या आवारातच हा कार्यक्रम होऊ शकतो.
थोड्याच दिवसांपूर्वीच या वैद्यकीय महाविद्यालयाला एमबीबीएस कोर्स संचालित करण्याची परवानगी मिळाली आहे. एक ऑगस्ट पासून हे वर्ग सुरू होतील.